Pune Corona Update: शहरातील कोरोनाबाधित मृतांच्या आकड्याने ओलांडला 500 चा टप्पा

Pune Corona Update: The number of corona-related deaths in the city has crossed the 500 mark शहरातील कोरोना मृत्यूदर 4.25 टक्के, गेल्या 82 दिवसांत शहरात दररोज सरासरी सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (शनिवारी) दिवसभरात 389 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.  त्यामुळे शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 11 हजार 854 झाली. त्यापैकी आतापर्यंत एकूण 7264 रुग्ण बरे झाले आहेत तर 4086 सक्रिय कोरोना रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दिवसभरात 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरातील कोरोना मृतांच्या आकड्याने 500 चा आकडा ओलांडला आहे. शहरातील कोरोना बळींची संख्या 504 झाली आहे. 

पुण्यात 30 मार्चला कोरोनाबाधिताचा पहिला मृत्यू झाल्याची नोंद आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका 52 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुरुवातीला कोरोना रुग्णांच्या प्रमाणात मृतांचा आकडा मोठा होता. त्यामुळे पुण्यातील कोरोना मृत्यू दर 10 टक्क्यांपेक्षाही जास्त होता. त्यामुळे शहरात कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली होती. हळूहळू कोरोना मृतांचे प्रमाण कमी करण्यात डॉक्टरांना यश आले.

शहरात 82 दिवसांत एकूण 504 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोना मृत्यूंचे प्रमाण 4.25 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. गेल्या 82 दिवसांत दररोज सरासरी सहापेक्षा अधिक रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याचे दिसून येत आहे.

शहरातील कोरोना मृत्यूदर आणखी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना महापौर मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सर्व डॉक्टरांना दिल्या आहेत.  मृत्युमुखी पडलेल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आधीपासून अन्य आजार आहे अशा व्याधीग्रस्त व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे.

शहरात आज ससून रुग्णालयात 5, नायडू 216, खाजगी 168 रुग्णांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 4086 झाली आहे. त्यापैकी 273 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. अतिदक्षता विभागात 221 रुग्णांवर उपचार सुरू असून 52 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, असे महापालिकेच्या दैनंदिन अहवालात म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

आज दिवसभरात 183 रुग्ण बरे झाले. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 7 हजार 264 झाली आहे. त्यामुळे सध्या 4086 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोनाबाधित मृत रुग्ण – 4.25 टक्के

कोरोनामुक्त रुग्ण – 61.28 टक्के

सक्रिय कोरोना रुग्ण – 34.47 टक्के

पुणे शहरात एकाच दिवसात 2 हजार 684 स्वॅब टेस्ट नोंदवल्या गेल्या आहेत. पुणे शहराची एकूण स्वॅब टेस्ट संख्या 86 हजार 871 इतकी झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.