Pune Corona Update : पुणे शहरात आता अवघे 33 कंटेन्मेंट झोन, जाणून घ्या प्रतिबंधित भागांची नावे….

महापौर मुरलीधर मोहोळ यांची घोषणा

एमपीसी न्यूज : पुणे शहरात आता कंटेंन्मेंट झोनची संख्या 59 वरून कमी झाली असून एकेकाळी शंभरी पार केलेल्या झोनची संख्या अवघ्या 33 वर आली आहे. नव्याने मायक्रो कंटेन्मेंट झोनची पुनर्रचना करण्यात आली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची (मायक्रो कंटेन्मेंट झोन) यादी प्रसिद्धी करून घोषणा केली आहे.

पुणे महापालिकेच्या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेंन्मेंट झोन) संदर्भात नवा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांचा यात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी पाच ऑक्टोबरला शहरातील 59 प्रतिबंधित क्षेत्रांची यादी महापालिका आयुक्तांनी जाहीर केली होती.

गेल्या 15 दिवसांत शहरात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने नव्याने प्रतिबंधित क्षेत्रांची पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार आता नवीन प्रतिबंधात्मक क्षेत्रांची संख्या 33 पर्यंत खाली आली आहे.

त्यामध्ये शहर मध्यवर्ती भाग कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गुरूवार पेठ, महात्मा फुले पेठ आणि घोरपडे पेठ (एकत्र), मुंढवा सर्वे नं.77, 78, पिंगळे वस्ती, आंबेगाव बुद्रूक सर्वे नं.15, चंद्रांगण सोसायटी, सिल्वर पार्क सोसायटी परिसर, कात्रज संतोष नगर, आंबेगाव बुद्रूक स.नं.16, कात्रज नित्यानंद रिहॅबिलीटेशन सेंटर,

मुकुंदनगर सुजय नगर, येरवडा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, वानवडी एसआरपीएफ, शिंदे छत्री काकडे वस्ती, रामटेकडी, आझादनगर, लोहगाव संतनगर, आदर्शनगर, पोरवाल रस्ता, निंबाळकर कॉलनी, स्प्रिंग सोसायटी, खराडी तुळजाभवानी नगर, आपले घर सोसायटी, खराडी पठारे ठुबे नगर, पर्वती जनता वसाहत,

वडगाव बुद्रुक स.नं. 14, 15, सनसिटी रस्ता, फुरसुंगी, भेकराई नगर, हडपसर स.नं.13, 18, 19 गोंधळे नगर, काळेपडळ, ससाणेनगर, मोहम्मदवाडी, कृष्णानगर वसाहत, धनकवडी, बालाजीनगर, पुण्याईनगर, कोंढवा शांती नगर सोसायटी, साळवे गार्डन, कर्वेनगर, हिंगणे बुद्रूक, कोथरूड पोस्टमन कॉलनी, शास्रीनगर,

पीएमसी कॉलनी, सागर कॉलनी, न्यू लोकमान्य वसाहत, पौड रस्ता, जयभवानी नगर, कोथरूड सुतारदरा, एरंडवणा, केळेवाडी, मामासाहेब मोहोळ शाळा, हनुमान नगर या भागांचा समावेश नव्या यादीत करण्यात आला आहे.

नव्याने तयार केलेल्या मायक्रो कंटेंन्मेंट झोनमध्ये ‘माझे घर माझे कुटुंब’ मोहीमेअंतर्गत घरोघरी सर्वेक्षण, तपासणी आणि औषधोपचार दिला जात आहे. शहरातील महापालिकेच्या कोविड केयर सेंटर सोबतच सर्व रुग्णालयांमध्ये कोविड करीता स्वतंत्र मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत.

जम्बो कोविड सेंटरमध्ये देखील करोना बाधितांची संख्या घटत असून शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दहा हजारांच्या खाली आहे. त्यामुळे मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या घटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

तरीही नागरिकांनी स्वतःसह कुटुंबाच्या काळजीसाठी मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिग नियमांचे पालन करावे. तसेच तीव्र किंवा सौम्य लक्षणे दिसल्यास तातडीने चाचणी करून डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

33 कंटेन्मेंट झोनची यादी – 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.