Pune corona Vaccination: पुणे महापालिका लसीकरण मोहीमेसाठी सज्ज ; कमला नेहरू रुग्णालयात शुभारंभ

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेकडून लसीकरण मोहीमेची जय्यत तयारी झाली आहे. देशव्यापी लसीकरण मोहीमेचा पुण्यातील लसीकरणाचा शुभारंभ कमला नेहरू रुग्णालयात सकाळी 9 वाजता होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेता गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, आरोग्य विभाग प्रमुख डॉ.आशिष भारती, सहायक विभाग प्रमुख डॉ.वैशाली जाधव आदी उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले, सकाळी 9 ते 5 या वेळेत हे लसीकरण होणार आहे. लसीकरणासाठी आठ केंद्र उभारण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी 100 नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेकडे कोविड लसीचे 48 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. यातील 10 टक्के वाया पकडले तरी  अंदाजे 22 हजार लाभार्थ्यांना दोन डोस मिळणार आहेत. त्याची तयारीही पूर्ण झाली आहे.

असे असतील लसीकरणाचे 4 टप्पे….

पहिल्या टप्प्यात सरकारी, निमसरकारी व खासगी क्षेत्रात काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार आहे. यानंतर दुसर्‍या टप्प्यात महापालिकेचे कर्मचारी, पोलिस, नागरिक संरक्षण दल, गृहरक्षक दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांना लस देण्यात येईल. यानंतर पन्नास वर्षे वयावरील जोखीमग्रस्त व्यक्तींना आणि शेवटच्या टप्प्यात सामान्य नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.

लसीकरण नेमके कसे होणार….

पहिल्या टप्प्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्याधिकारी व कर्मचार्‍यांची यादी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक बूथवर 1 लस टोचणारा, दोन पर्यवेक्षक आणि एक सुरक्षाकासह पाच जणांची टीम असणार आहे. पोर्टलवर नाव व नोंदणीकृत ओळखपत्र असलेल्यांना लसीकरणाचा दिनांक, वेळ याचा एसएमएस येणार आहे.

या रुग्णालयात होणार लसणीकरण मोहीमेची सुरूवात…

1) राजीव गांधी रुग्णालय, येरवडा

2) कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ

3) ससून रुग्णालय, पुणे स्टेशन

4) सुतार दवाखाना, कोथरूड

5) दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एरंडवणा

6) रूबी हॉल क्लीनिक, ताडीवाला रस्ता

7) नोबल हॉस्पिटल, हडपसर

8) भारती हॉस्पिटल, धनकवडी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like