Pune : महापालिकेच्या अंदाजपत्रकाला कोरोनाचा फटका ; केवळ 33 टक्केच अंमलबजावणी होणार

एमपीसी न्यूज – स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पुणे महापालिकेचा तब्बल 7 हजार 390 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्याला यंदा कोरोनाचा फटका बसणार आहे. रासने यांनी विविध योजना अर्थसंकल्पात मांडल्या होत्या. महापालिकेच्या अंदाजपत्रकाला 77 टक्के कात्री लागणार आहे. केवळ 33 टक्केच अंमलबजावणी होणार आहे. तसे आदेश शासनातर्फे देण्यात आले आहे.

महापालिकेचे अंदाजपत्रक 10 हजार कोटींच्या आसपास जाण्यासाठी उत्पन्न वाढविण्यावर स्थायी समिती अध्यक्ष रासने यांनी मोठ्या प्रमाणात भर दिला होता. त्यासाठी वेगळा कक्षही स्थापन करण्यात आला होता. सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. मागील अडीच महिन्यांपासून महापालिकेच्या अंदाजपत्रकावर कोरोनाचा परिणाम झाला आहे.

पुणे शहराच्या मध्यवस्तीत मिडीबसच्या माध्यमातून अवघ्या १० रुपयांत पुणेकरांना प्रवास करण्यासाची महत्वपूर्ण योजना अंदाजपत्रकात मांडण्यात आली होती. त्यावर विरोधी पक्षांनी टीका केली होती.

तर, सत्ताधाऱ्यांनी स्वागत केले होते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून सारसबागेचा पुनर्विकास करण्यासह स्मार्ट व्हिलेज, कोथरूडमध्ये कला अकादमी, शिवाजी रस्त्यावर ग्रेड सेपरेटर, सार्वजनिक गणेशोत्सव संग्रहायल अशा अनेक योजनांसाठी आवश्यक तरतूद करण्यात आली होती.

मात्र, आता कोरोनाच्या संकटामुळे कोणताही नवा प्रकल्प, योजना राबविण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना शासनातर्फे देण्यात आल्या आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पगार, अत्यावश्यक सेवा-सुविधा व त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी होणारा खर्च आणि आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाची तरतूद पालिकेला करावी लागणार आहे.

त्यामुळे 2021 च्या अंदाजपत्रकात जाहीर केलेल्या विविध योजना कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. कोरोनामुळे महापालिकेची चांदनी चौकातील शिवसृष्टी, बालगंधर्व पुनर्विकास कागदावरच राहणार असल्याचे दिसून येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.