Pune : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे कोरोनाची स्थिती अधिक गंभीर : गिरीश बापट

महाराष्ट्र बचाओ आंदोलनात पुण्यात पाच हजारांहून अधिक भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज – भाजपने गेले दोन महिने राज्य शासनाला पूर्ण सहकार्य केले आहे. शासनाच्या निर्णयाबरोबर विरोधी पक्ष म्हणून भाजप समर्थन करीत आहे. परंतु राज्य सरकार घेत असलेले निर्णय आणि करीत असलेल्या उपाययोजना खूपच तुटपुंज्या आहेत. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे कोरोनाची स्थिती अधिक गंभीर झाली आहे, असा आरोप खासदार गिरीश बापट यांनी केला.

सर्वसामान्य जनतेचा या सरकारवरील विश्वास उडाला आहे. शेतकऱ्यांसह बारा बलुतेदार, लॉंड्री आणि केशकर्तनालयातील कर्मचारी, पन्नास हजाराहून अधिक रिक्षाचालक, घरेलु कामगार, पथारीवाले भयभीत झाले आहेत. या सर्वांच्या बॅंक खात्यात दरमहा दहा हजार रुपये भरण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही खासदार बापट यांनी यावेळी केली.

पुणे शहर भाजपच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या महाराष्ट्र बचाओ आंदोलनात शहरातील पाच हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभागी घेतला. कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारचा अपयशाचा यावेळी निषेध केला.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट यांनी पक्षाच्या शहर कार्यालयाबाहेर आंदोलनात सहभाग घेतला. शहराच्या विविध भागांत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या अंगणात शासनाच्या निष्र्कियतेच्या घोषणा असणारे फलक प्रदर्शित करून जनतेचे आणि सरकारचे लक्ष वेधले. यावेळी सामाजिक अंतर कटाक्षाने पाळण्यात आले होते.

महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, सरचिटणीस राजेश पांडे, दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर, गणेश घोष यांनी आंदोलनात ठिकठिकाणी सहभाग घेतला.

कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. प्रशासनावर अंकुश नाही, बेजबाबदारपणा आणि राज्य शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पुणे शहराची स्थिती गंभीर झाली आहे.

ससुनमध्ये दाखल केलेल्या चार रुग्णांपैकी एकाचा मृत्यू होत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण खूप मोठे आहे. अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. ते वेगवेगळे आदेश जारी करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

रेड कंटेनमेंट क्षेत्राव्यतिरिक्त लॉकडाऊन शिथिल करून जनजीवन आणि उद्योगधंदे पूर्ववत सुरू करण्याबाबत शासनाचे निश्चित नियोजन आणि धोरणाचा अभाव आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने पॅकेज जाहीर केलेले नाही.

त्यामुळे या निष्क्रिय सरकारच्या कारभारात सुधारणा व्हावी यासाठी लक्ष वेधण्याच्या उद्देशाने या आंदोलनाचे आयोजन केल्याचे शहराध्यक्ष मुळीक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.