Pune : ‘कोरोना’चा पीएमपीएमएल’मधील प्रवाशांनीही घेतला धसका

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ रोगाने जगभरात धुमाकूळ घातलेला असताना त्याचे दोन रुग्ण पुणे शहरातही आढळले. त्यामुळे ‘पीएमपीएमएल’मधून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांनीही ‘कोरोना’ धसका घेतल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे.

सार्वजनिक बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिक तोंडाला रुमाल बांधून असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिंकतांना, खोकलतांना रुमाल वापरण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

तर, आता हातात हात घेण्याऐवजी ‘नमस्ते’ करण्याचे आवाहन पालकमंत्री अजित पवार आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. गर्दीच्या ठिकाणी जमू नये, सार्वजनिक कार्यक्रम कुटुंबांसोबतच साजरे करण्यास पुणे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

‘कोरोना’मुळे आर्थिक नुकसान
‘कोरोना’ चा फटका पर्यटक व्यवसायिकांनाही बसला आहे. विदेशात जाणाऱ्या नागरिकांनी ‘बुकिंग’ रद्द केल्याची माहिती एका पर्यटक व्यावसायिकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. दरवर्षी या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक विदेशात जात असतात. आता मात्र या रोगामुळे आमचे आर्थिक नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.