Pune : कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यातील 5 कोटी 73 लाख बँकेला परत

एमपीसी न्यूज- पुण्यातील कॉसमॉस बँकेवर झालेल्या सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यात लंपास केलेल्या 94 कोटी 42 लाख रकमेपैकी 5 कोटी 73 लाख रुपये परत मिळविण्यात पुुण्याचा सायबर पोलिसांना यश आले आहे. चोरटयांनी हे पैसे हाँगकॉँग येथील हेनसेंग बँकेत जमा केले होते.

कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील मुख्यालयातील एटीएम स्वीचवर (सव्‍‌र्हर यंत्रणेवर) 11 ऑगस्ट 2018 रोजी सायबर हल्ला करण्यात आला होता. सायबर चोरट्यांनी त्याद्वारे 94 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम लुटली होती. तब्बल 26 देशांतील बँकांच्या एटीएममधून हे पैसे काढण्यात आले होते. तर हॉंगकॉंगमधील हेनसेंग बॅंकेत 13 कोटी रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आली होती.

अशा प्रकारे सायबर हल्ल्यात चोरीला गेलेली रक्कम परदेशातुन परत मिळवण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात सायबर पोलिसांनी मुंबई, मुंब्रा, भिवंडी, कोल्हापुर, पुणे व इंदौर या शहरातील एटीएममधून पैसे काढणाऱ्या 14 जणांना अटक केली आहे.

रक्कम परत मिळावी यासाठी सायबर पोलिसांनी हॉंगकॉंगची हेनसेंग बॅंक, न्यायालय व तेथील सरकारशी तात्काळ पत्रव्यवहार केला. त्यानंतर पोलिसांनी 10 कोटी रुपये गोठविले होते. ही रक्कम परत मिळावी, यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरु होते. दरम्यान हॉंगकॉंगमधील न्यायालयात सोमवारी सकाळी ही प्रक्रिया पार पडली. त्यानंतर कॉसमॉस बँकेच्या खात्यात 5 कोटी 73 लाख रुपये पैसे जमा झाले.

या गुन्ह्याच्या तपासासाठी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापना करण्यात आले होते. या पथकामध्ये सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी व सायबर तज्ज्ञांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.