Pune : उंड्रीत स्वास्थपूर्ण आयुष्य व एकात्मतेची धाव

एमपीसी न्यूज – निरोगी, सुदृढ आणि स्वास्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याच्या उद्देशाने कंट्री क्लब आणि फ्री रनर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उंड्री येथे मॅरेथॉनचे उत्साहात पार पडले. या मॅरेथॉनमध्ये एन आय बी एम, मोहम्मदवाडी आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 700 जणांनी धाव घेतली.

रविवारी (दि. 19) सकाळी सहा वाजता उंड्रीतील कंट्री क्लबपासून या एकात्मता मॅरेथॉनला सुरवात झाली. कंट्री क्लबचे अध्यक्ष वाय राजीव रेड्डी आणि फ्री रनर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक कमांडर जितेन्द्रन नायर यांनी झेंडा दाखवून एकात्मता धावेचे उद्घाटन केले. दहा, पाच आणि तीन किलोमीटर या तीन प्रकारांमध्ये ही मॅरेथॉन घेण्यात आली.

रेड्डी म्हणाले, “आपली जीवनशैली ही नियमित व शिस्तबद्ध असेल तर आरोग्याच्या समस्या भेडसावत नाहीत. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे आपण आपले स्वास्थ उत्तम प्रकारे ठेवू शकतो. मित्र परिवार तसेच कुटुंबाने एकत्र येऊन शरीर स्वास्थ्य उत्तम रहावे यासाठी एकत्रित प्रयत्न करावे.”

नायर म्हणाले, “मॅराथॉन आयोजित करताना ही स्पर्धा न ठेवता उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे हीच इच्छा होती. समाजात स्वास्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी जनजागृतीची गरज आहे आणि त्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम गेली दोन वर्षे आम्ही राबवत आहोत.” कार्यक्रमाचा समारोप ऋतुजा इंगळे आणि ग्रुप यांच्या झुंबा या व्यायाम प्रकाराच्या प्रात्यक्षिकाने करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.