Pune : भीक मागण्यासाठी केले चिमुरड्याचे अपहरण, प्रियकर प्रेयसी गजाआड

एमपीसी न्यूज- भीक मागण्याच्या उद्देशाने रस्त्यावर खेळणाऱ्या तीन वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या प्रियकर प्रेयसीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून तीन वर्षीय मुलाची सुटका करून सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात सोपविले.

लाला शिवाजी सूर्यवंशी (वय 38) आणि सुनीता लक्ष्मण बिनावत (वय 30) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही घटस्फोटित असून त्यांना मुलंही आहेत. त्यांनी कोंढव्यातील शालिमार सोसायटीजवळ खेळत असणाऱ्या अविनाश आडे (वय साडेतीन) या मुलाला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून पळवून नेले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकला बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला. अपहृत मुलाच्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे खंडणीसाठी अपहरण झाल्याची शक्यता सुतराम नव्हती. त्यामुळे भीक मागण्याच्या उद्देशानेच त्याचे अपहरण झाले असण्याची शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी पुणे शहरातील 110 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यातील एका कॅमेऱ्यात संशयित आरोपी चिमुकल्यासह दिसले. आरोपीची ओळख पटवून पोलीस आरोपीचा माग काढत वीरगाव तालुका पुरंदर पोहोचले. या गावात श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा चालू असल्याने मोठी गर्दी होती. या गर्दीमध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून एका झुडपात लपून बसलेल्या आरोपींना अटक केली आणि मुलाची सुखरूप सुटका केली.

आरोपींकडे अधिक चौकशी केली असता ते भीक मागून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. भीक मागताना लहान बाळ जवळ असल्यास जास्त पैसे मिळतात. त्यामुळे त्यांनी या मुलाचे अपहरण केल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.