Pune Crime : महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  एका महिला पोलीस शिपायाला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्न करण्यात नकार देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच आरोपीने पीडित महिलेकडून पाच लाख रुपये आणि नऊ तोळे सोन्याचे दागिने घेतले होते. तेसुद्धा परत न करता तिची फसवणूक केली आहे.

रहीम बशीर चौधरी (वय 30) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. हा पोलिस अधिकारी सध्या नांदेड पोलीस दलात कार्यरत आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा पूर्वी पुणे पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर होता. खात्यांतर्गत परीक्षेत तो पोलीस उपनिरीक्षक झाला असून सध्या नांदेड पोलीस दलात कार्यरत आहे. पुणे पोलीस दलात असताना त्याची ओळख फिर्यादी सोबत झाली होती. या ओळखीचा फायदा घेत त्याने फिर्यादी महिलेशी जवळीक वाढवली आणि लग्न करण्याच्या अनुषंगाने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. याच काळात आरोपीने फिर्यादी कडून पाच लाख रुपये आणि नऊ तोळे सोन्याचे दागिने घेतले होते.

दरम्यान रहीम चौधरी हा नांदेड पोलीस दलात कार्यरत असून त्याने मागील महिन्यात साखरपुडा केल्याची माहिती फिर्यादी महिलेला मिळाली होती. त्यानंतर फिर्यादी महिलेने फसवणूक झाली असल्याचे सांगत पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रहीम चौधरी यांच्याविरोधात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.