Pune Crime : शिरूरमधील महिलेवर प्राणघातक हल्ला करून डोळे निकामी करणारा आरोपी चाकणमधून जेरबंद

एमपीसी न्यूज – शिरूर तालुक्यातील न्हावरे इथे एका महिलेवर विनयभंगाचा प्रयत्न करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या त्या विक्षिप्त आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी चाकण येथील मुख्य चौकामध्ये जेरबंद केले.

कुंडलिक साहेबराव बगाडे (रा. उंडवडे सुपे, ता. बारामती, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्यांनी हे कृत्य का केले याचा तपास शिरूर पोलिस करीत आहेत.  3 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला होता. पीडित महिला जेवण झाल्यानंतर नैसर्गिक विधींसाठी बाहेर गेली होती. यावेळी आरोपीने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिने विरोध केल्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.

यामध्ये तिच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर जखमा झाल्या असून या दोन डोळ्यांची दृष्टी गेली आहे. या महिलेवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी न्हावरे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळली. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीचा फोटो व्हाट्सअपवर व्हायरल करून ही व्यक्ती दिसल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान न्हावरे येथील एका चायनीज सेंटरमध्ये काम करणाऱ्या एक व्यक्तीचे वर्णन पोलिसांनी वायरल केलेल्या फोटोशी मिळते-जुळते असून तो गुन्हा घडल्याच्या दिवसापासून कुठेतरी निघून गेल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीशी अधिक माहिती घेतली असता तो स्वभावाने रागीट असून नेहमी दारूच्या नशेत धुंद असतो, त्याच्या गळ्यात नेहमी भगवा मफलर असतो. नेहमी तो कोणाशी तरी वाद घालत असतो, भीक मागतो, मुका असल्याची खूण करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास त्याच्याभोवती केंद्रित केला. तो जाण्याची संभाव्य ठिकाणी शोधली आणि शिक्रापूर पोलिसांनी सोमवारी संध्याकाळच्या सुमारास चाकण येथून त्याला ताब्यात घेतले.  त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. हा गुन्हा त्याने का केला? तो त्या ठिकाणी कसा पोहोचला याची माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.