Pune Crime : अवघ्या काही तासात दरोड्यातील आरोपी जेरबंद, कोथरूड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – दरोड्याची तक्रार आल्यानंतर अवघ्या काही तासात दरोडेखोरांना पकडण्याची कामगिरी कोथरुड पोलिसांनी केली आहे. आरोपींमध्ये वृद्धांना व रुग्णांना परिचारिकांची सेवा पुरवणा-या एका संस्थेचा मालकही सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आणखी काही गुन्हे या टोळीकडून केले गेले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आकाश कांबळे (वय 22), दीपक सुगावे (वय 21), संदीप हांडे (वय 25), छगन जाधव (वय 48) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुरुवारी रात्री कोथरूड परिसरात एका वृद्ध दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला. रोख रक्कम आणि दागिने अशी सर्वसाधारणपणे 11 लाख 52 हजार रुपयांची मालमत्ता दरोडेखोरांनी लंपास केली होती.. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात 74 वर्षीय जेष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व त्यांच्या पत्नी हे दोघेचे येथे त्यांच्या बंगल्यात राहतात.त्यांच्या देखभालीसाठी त्यांनी नर्सिंग ब्युरोकडून एक मदतनीस कामास ठेवला होता. दरम्यान काल मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी व त्याचे दोन साथीदार हे गच्चीवर असलेल्या खिडकीचे गज कापून आत शिरले व त्यांनी फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्याला धारधार शस्त्र लावून. तसेच त्यांच्या हातावर वार करत त्यांना जखमी केले.

या दांपत्याकडे पूर्वी काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने काल रात्री या दांपत्याच्या घरावर दरोडा टाकला. हा कर्मचारी पुण्यातील एका नर्सिंग ब्यूरोकडून पुरविण्यात आला होता. सदर आरोपीने पूर्वी त्या घरी काम केले असल्याने या कर्मचाऱ्याला त्यांच्या घरातील लोकांची आणि वस्तूंची चांगली माहिती होती. चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी दाम्पत्याला तिजोरीत संकेतांक सांगायला लावला आणि त्यातील रोख रक्कम आणि दागिने काढून घेतले.

सदर फिर्यादी वृद्ध असून त्यातील एकाला डायलिसिसचा त्रास आहे. घरकामासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या एका संस्थेचा मालक दरोडेखोर असल्याचे निष्पन्न झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. त्याने आणखी किती गुन्हे केले आहेत याचा तपास पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.