Pune : लॉकडाउनमध्ये सिगारेटचा पुरवठा करणाऱ्या डिलरवर गुन्हा; 39 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : लॉकडाउनमध्ये सिगारेटचा पुरवठा करणाऱ्या डिलरविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून 37 बॉक्समधील 39 लाखांच्या सिगारेट जप्त करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिली.

या कारवाईबाबत अधिक माहिती देताना बच्चन सिंह म्हणाले, सिगारेटचा एक डिलर कोरेगाव पार्क येथे सिगारेट विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेशकुमार महाडिक यांनी एका व्यक्तीला ग्राहक म्हणून त्याच्याकडे पाठवले. डिलरने सिगारेटचा बॉक्स देण्याची तयारी दर्शवत दुप्पट म्हणजे पाच हजार रुपये इतकी किंमत सांगितली.

संबंधित ग्राहकाने त्याच्याकडून सिगारेटचा बॉक्स विकत घेतला. यानंतर पुणे पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने तेथे छापा टाकून सिगारेटचे 37 बॉक्स जप्त केले. या बॉक्स किंमत 39 लाखांची इतकी आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्याला अटक करण्यात आलेली नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर पोलिसांसमोर हजर राहण्याचा आदेश त्याला देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.