Pune Crime : धनत्रयोदशीला देवासमोर ठेवलेले दागिने घरफोडी करून चोरी करणा-याला अटक

एमपीसी न्यूज – धनत्रयोदशीच्या दिवशी पुजेसाठी देवासमोर ठेवलेले 11 तोळे सोने, मोबाईल व रोख रक्कम घरफोडी करुन चोरुन नेणा-या चोराला पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासांत अटक केली आहे. रविवारी (दि.15) येरवडा परिसरात हि कारवाई करण्यात आली.

अविनाश ऊर्फ सुक्या संजय शिंदे (वय 18, रा. जयजवान नगर, येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी पुजेसाठी देवासमोर ठेवलेले 11 तोळे सोने, मोबाईल व रोख रक्कम घरफोडी करुन चोरी केल्याचा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा आरोपी सुक्या शिंदे याने केला असल्याची माहिती तपास पथकातील अंमलदार पोलीस हवालदार गणपत थकले, पोलीस नाईक नवनाथ मोहिते व पोलीस शिपाई राहुल परदेशी यांना मिळाली. दरम्यान, त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांने साडे 4 लाख किंमतीचे 11 तोळे सोने तसेच दोन मोबाईल व रोख रक्कम चोरी केल्याचे कबुल केले. त्याच्याजवळून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे करत आहेत.

हि कामगिरी पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ चार पुणेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक युनुस शेख व पोलीस निरीक्षक गुन्हे अजय वाघमारे, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक समीर करपे, पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार प्रदिप सुरवे, पोलीस हवालदार गणपत थिकोळे, पोलीस नाईक नवनाथ मोहिते, पोलीस शिपाई राहुल परदेशी, सुनिल सकट, समीर भोरडे, अमजद शेख, अनिल शिदे, गणेश वाघ, तेजस पवार, किरण घुटे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.