Pune Crime : ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारा भामटा अटकेत

एमपीसी न्यूज – आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेत प्रवेश मिळवून डिस्ट्रीक डेव्हलपमेंट कोऑर्डिनेटर पदावर असल्याचा बनाव करून बोगस जे. के. व्हेंचेर्स नावाची कंपनी स्थापन करून नागरिकांना कोट्यावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केले. ही घटना जानेवारी 2017 ते नोव्हेंबर 2020 मध्ये घडली.

प्रणय उदय खरे (वय 28, रा. साळुंखे विहार, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अश्विनीकुमार बळीराम कांबळे (वय 44) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रणयने पुण्यातील आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेत प्रवेश मिळवून डिस्ट्रीक डेव्हलपमेंट कोऑर्डिनेटर पदावर असल्याचा बनाव केला. त्यानंतर बोगस जे. के. व्हेंचेर्स नावाची कंपनी स्थापन करीत त्याने कंपनी आर्ट ऑफ लिव्हिंगशी संबंधित असल्याचे गुंतवणूकदारांना भासविले. त्यानंतर रत्नागिरीत तब्बल 7 हजार एकर जागा घेतल्याचे सांगितले. त्यानुसार संबंधित जागेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास पहिल्या 11 गुंतवणूकदारांना 1 कोटी रूपये देण्याचे आमिष दाखविले.

त्यानुसार अश्विनीकुमार यांनी 2017 मध्ये जे. के. व्हेंचेर्स कंपनीत 1 कोटी 45 लाख 17 हजार रूपये गुंतविले. मात्र, प्रणयने त्यांना कोणताही मोबादला न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने त्याला अटक केली असून न्यायालयाने प्रणयला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.