Pune Crime : कर्तव्यावर पोलिसाचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; वाचवण्यासाठी गेलेला दुसरा कर्मचारी जखमी

एमपीसी न्यूज – कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्याच पोलीस कर्मचाऱ्याला बंदुकीची गोळी लागल्याने तो जखमी झाला.

आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार शिवाजीनगर येथील मुख्यालयात घडला. बेंडाळे असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलीस शिपाई सस्ते आणि भेंडे हे शिवाजीनगर मुख्यालयात नेमणुकीस आहेत. कॉर्टर गेट परिसरात सस्ते आणि एक महिला कर्मचारी रात्रपाळीस कर्तव्यावर होते. यावेळी महिला कर्मचाऱ्यासोबत सस्ते यांचे भांडण झाले. याच वादातून त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हा सर्व प्रकार बेंडाळे यांच्या लक्षात आला आणि ते सस्ते यांना वाचवण्यासाठी केली असता गोळी चुकून बेंडाळे यांना लागली. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट करण्यात आले आहे.

घटनेनंतर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.