Pune : जीवे मारण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्यानेच गुन्हा दाखल – युवराज ढमाले यांचा खुलासा

राजकीय षडयंत्र असण्याचा संबंध नाही; 'सीबीआय' चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल : Crime filed for making death threats - Yuvraj Dhamale's revelation

एमपीसी न्यूज – गोळ्या घालून किंवा अपघाती मृत्यू घडवून आणण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्याने मला माझ्या जीवाची, कुटुंबाची काळजी वाटू लागली होती. खूप अस्वस्थ वाटल्यानेच माझे मेव्हणे माजी खासदार संजय काकडे आणि बहीण उषा संजय काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली. , असा खुलासा बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

काकडे दाम्पत्यांकडून माझ्या जीविताला काही धोका होऊ नये, यासाठीच हा गुन्हा दाखल केला आहे. यामागे कोणतेही राजकीय षडयंत्र नाही किंवा पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव असण्याचे कारण नाही.

या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागामार्फत सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल,  असेही काकडे यांनी सांगितले.

माजी खासदार संजय काकडे व उषा संजय काकडे यांच्यावर त्यांचे मेव्हणे युवराज ढमाले यांनी गुन्हा दाखल केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे राजकीय षडयंत्र असल्याचे, तसेच आपण अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले होते.

त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युवराज ढमाले यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

ढमाले म्हणाले, “कौटुंबिक ईर्ष्येतून काकडे दाम्पत्याने 2017 पासून वेळोवेळी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

घरातील वाद सामंजस्याने मिटण्याच्या आशेने आणि प्रचंड मानसिक दबावाखाली असल्याने मी गेली दोन वर्षे गुन्हा दाखल करू शकलो नाही. परंतु, आता मला खूप अस्वस्थ व दबाव वाटू लागल्याने भीतीपोटी धीर एकवटून 27 मे 2020 रोजी पोलिसांना पत्र दिले.

त्यानंतर 2  ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी एक दिवसांत गुन्हा दाखल केल्याचे सांगून काकडे माध्यमांची दिशाभूल करत आहेत.

त्याचबरोबर काकडे यांनी गेल्या 10  वर्षात त्यांचा माझ्याशी कोणताही व्यावसायिक संबंध नव्हता, हे चुकीचे सांगितले आहे. 23  मे 2019 रोजी आमच्यातील व्यवहार झाला आहे.”

ढमाले पुढे म्हणाले, “आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भावा-बहिणीतील हा वाद चव्हाट्यावर आला. तीन वर्षांपासून राखी बांधून घेता आली नाही, याचे दुःख वाटते.

माझ्या प्रगतीची ईर्षा करणारी माझीच बहीण आहे, याचेही अधिक वाईट वाटते. आपल्या भावाच्या जीवावर उठण्याचा विचार करणाऱ्या बहिणीला ईश्वराने सद्बुद्धी द्यावी.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.