Pune Crime : लष्करात अधिकारी असल्याचे भासवून खानावळ चालवणाऱ्या महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज – लष्करात कॅम्प प्रमुख असल्याचे भासवून खानावळ चालवणाऱ्या महिलेची 9 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सुनिता गोपाळ जाडकर (वय 48) या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात महिले विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9 जून 2020 रोजी हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची कोथरूड परिसरात खानावळ आहे. 9 जून रोजी त्यांना एका महिलेचा फोन आला होता. त्या महिलेने आपण लष्कराच्या कॅम्पमध्ये अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. तसेच पंधरा लोकांचे जेवण पाहिजे, असे सांगितले. त्यासाठी पैसे ऑनलाईन देणार असल्याचे सांगितले.

पैसे ऑनलाईन मिळणार असल्यामुळे आरोपी महिलेने फिर्यादीच्या मोबाईल वर आलेला ओटीपी नंबर देण्यास सांगितले. आणि हा नंबर देताच फिर्यादी महिलेच्या बँक खात्यामधून नऊ हजार रुपये काढून घेतले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.