Pune Crime News : राजीनाम्यासाठी संस्थाचालकाचे अपहरण करून बेदम मारहाण

एमपीसीन्यूज : जळगाव येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या संस्थेच्या संचालकाला राजीनामा द्यावा, या मागणीसाठी अपहरण करुन पुण्यातील सदाशिव पेठेत डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात 28 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जानेवारी 2018 जानेवारी 2019 या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी विजय पाटील (वय 52) यांनी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तानाजी भोईटे, वीरेंद्र भोईटे आणि निलेश भोईटे यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की,फिर्यादी हे वडगाव येथील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेचे संचालक आहेत. आरोपींनी त्यांना कागदपत्र देण्याच्या बहाण्याने पुण्यामध्ये बोलावले. पुण्यात आल्यानंतर त्यांचे अपहरण केले आणि सदाशिव पेठेतील एका फ्लॅटमध्ये त्यांना डांबून ठेवले.

तसेच त्यांच्या गळ्याला आणि पोटाला चाकू लावून राजीनाम्यासाठी दबाव टाकण्यात आला. आरोपींनी विजय पाटील यांच्यासह आलेल्या लोकांनाही डांबून ठेवले होते.

संस्थेच्या इतर संचालकाचे राजीनामे घेऊन यावेत, अशी मागणी करत त्यांना हात-पाय बांधून डांबून ठेवले होते. इतकेच नाही तर त्यांना वेळोवेळी बेदम मारहाणही करण्यात आली. शिवाय खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्यांच्याकडून पाच लाख रुपये खंडणी घेण्यात आली.

कोथरूड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.