Pune Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह पुरला शेतात, आठ दिवसानंतर फुटली वाचा

एमपीसी न्यूज – बायकोचे कामगारासोबत सोबत असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती भाऊ घरच्यांना देईल, या भीतीपोटी एका व्यक्तीने बायको आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने भावाचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी एका शेतात खड्डा करून मृतदेह पुरला.

परंतु आठ दिवसानंतर या घटनेला वाचा फुटली असून पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. मुळशी तालुक्यातील कुळे गावात 13 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

संतोष विश्वनाथ बाळेकाई (वय 40) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पौड पोलिसांनी या प्रकरणी स्वामीनाथ उर्फ उमेश विश्वनाथ बाळेकाई (वय 45), अमृता उमेश बाळेकाई (वय 38) आणि विजयकुमार नारायण राठोड (वय 40) या तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी प्रसाद कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्या फार्महाऊसवर आरोपी स्वामीनाथ, त्याची पत्नी अमृता आणि विजयकुमार केअरटेकर म्हणून काम करत होते. अमृता आणि विजयकुमार यांच्यात मागील अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. याची माहिती अमृताचा पती स्वामीनाथ यालाही होती. मयत संतोष हे दिवाळीनिमित्त अक्कलकोटहून भाऊ विश्वनाथ याच्याकडे आले होते. यावेळी त्यांना भावजयीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागली.

दरम्यान संतोष गावी गेल्यानंतर आपल्या बायकोचे अनैतिक संबंध जगजाहीर करेल अशी भीती विश्वनाथ याला वाटत होती. त्यामुळे त्याने पत्नी अमृता, तिचा प्रियकर विजयकुमार यांना सोबत घेऊन संतोषला ठार मारण्याचा कट रचला. आणि दिवाळीच्या रात्री (13 नोव्हेंबर) त्याच्या गळ्यावर कोयत्याने वार करून आणि गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर फार्म हाऊसच्या बाजूला खड्डा करून त्याचा मृतदेह पुरला.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी फिर्यादी फार्महाउसवर गेले असता त्यांना संतोष दिसला नाही. त्यांनी आरोपींकडे चौकशी केली असता तिघांनीही वेगवेगळी उत्तरे दिली. त्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी फार्महाऊस भोवती चक्कर मारली असता एके ठिकाणी त्यांना खड्डा खणल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तिघांनाही विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली.

हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.