Pune Crime News : गुंड वाघाटेच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढणाऱ्या 100 जणांची रवानगी येरवडा कारागृहात

एमपीसीन्यूज : सहकारनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याची बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्याच्या अंत्ययात्रेत तरुणांनी दुचाकी रॅली काढली होती. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोनशे जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील शंभर जणांना अटक केली असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, माधव वाघाटे यांची हत्या झाल्यानंतर कोरोना नियमांचे उल्लंघन करत धनकवडी येथील त्याच्या राहत्या घरापासून ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेत दीडशे ते दोनशे जणांचा जमाव दुचाकीवरून सहभागी झाला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांच्या 15 पथकाने अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या शंभर जणांची ओळख पटवली असून त्यांना अटक केली आहे. तसेच 40 हून अधिक दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. याशिवाय आणखी काही आरोपीची धरपकड सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.