Pune Crime News : पोलिसांकडून 1174 गुन्हेगारांची झाडाझडती, 250 अटकेत

मोठा शस्त्रसाठा जप्त

एमपीसीन्यूज : पुणे पोलिसांनी शहराच्या विविध भागात सराईत गुंडांविरोधात राबवलेल्या विशेष कारवाईत एका रात्रीत 1174 गुंडांची झाडाझडती घेतली. यातील 250 गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 40 कोयते, 5 तलवारी, 1 कुकरी, 2 पालघन, 1 सुरा असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

शहरात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पुणे पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी काल रात्री चार तास कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांची कुंडली तपासली.

त्यामध्ये तब्बल 1 हजार 174 गुन्हेगार मिळून आले आहेत. आर्म अ‍ॅक्टनुसार पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून दोन गावठी पिस्तूल, 9 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याशिवाय शहरभरात विविध पोलीस ठाण्यातंर्गत 250 आरोपींना अटक करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरांतर्गत गुन्हेगारांची झाडाझाडती घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. त्यानुसार सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी काल रात्री नऊ ते एक वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

एकाचवेळी करण्यात आलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांची पळता भुई झाली. गुन्हे शाखेच्या पाच पथकातील अधिका-यांसह कर्मचा-यांनी ठिकठिकाणी शोध मोहिम राबवून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, गुन्हे शाखेच्या परिमंडळ एक ते पाच पथके, प्रत्येक पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 28 परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.