Pune Crime News : गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणात 19 वर्षीय तरुणीला अटक

एमपीसी न्यूज – हॉटेलच्या व्यावसायिक स्पर्धेतून गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचा काही दिवसांपूर्वी डोक्यात तलवारीने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. पोलिसांनी यातील मुख्य आरोपी सह सुपारी देणाऱ्या हॉटेल मालकालाही अटक केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात एका 19 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली.

गुन्ह्यात वापरलेली तलवार आरोपी तरुणीने घरात लपवून ठेवत आरोपींना मदत केल्यामुळे तिला अटक करण्यात आली. काजल (वय 19) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी या प्रकरणी यापूर्वीच बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय 56), निखिल बाळासाहेब खेडेकर (वय 24), निखिल मंगेश चौधरी (वय 20), गणेश मधुकर माने (वय 20), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय 23), अक्षय अविनाश दाभाडे (वय 27) करण विजय खडसे (वय 21) आणि सौरभ कैलास चौधरी (वय 21) यांच्यासह दहा जणांना अटक केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जुलै च्या रात्री रामदास आखाडे हॉटेल गारवा च्या बाहेर खुर्चीवर फोनवर बोलत बसले होते. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या रामा वायदंडे याने तलवारीने त्यांच्या डोक्यात जोरदार वार केले आणि तो पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या रामदास आखाडे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.

पोलिसांच्या तपासात रामदास आखाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला व्यावसायिक स्पर्धेतून झाला असल्याचे निष्पन्न झाले. गारवा हॉटेल शेजारी आरोपी बाळासाहेब खेडेकर यांचे हॉटेल होते. रामदास आखाडे यांचे हॉटेल कायमस्वरूपी बंद पडले तर आपला व्यवसाय वाढेल असा विचार करून बाळासाहेब खेडेकर यांनी सौरभ चौधरी याला आखाडे यांचा खून करण्यास सांगितले होते. संसार स्वरूप चौधरी याने इतर आरोपींच्या मदतीने आखाडे यांच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान आरोपींनी रामदास आखाडे यांचा खून केल्यानंतर गुन्ह्यात वापरलेल्या दोन तलवारी लपविण्यासाठी काजलकडे दिल्या होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी काजलच्या घरी जाऊन विचारपूस केली होती परंतु तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली असता पोत्यात लपवून ठेवलेल्या दोन तलवारी सापडल्या. या तलवारीवर लालसर रंगाचे रक्ताचे डाग आढळले आहे. त्या तलवारीचा वापर गुन्ह्यात झाला असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्या तलवारी जप्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.