Pune Crime News :मार्केटयार्डमध्ये टोळक्याचा धुडगूस, 40 ते 50 वाहने फोडली

एमपीसीन्यूज : मार्केटयार्ड ( Marketyard) परिसरातील आंबेडकर नगर येथील रस्त्याच्या कडेला पार्क केलेली 40 ते 50 वाहने दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने फोडली (Broke). बुधवारी रात्री हा प्रकार घडला. मार्केटयार्ड पोलिसांनी ( Marketyard Police) या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, मार्केट यार्ड परिसरात आंबेडकर नगर वसाहत आहे. या वसाहतीत मोठ्या प्रमाणात कष्टकरी वर्ग राहतो. त्यांची दुचाकी, हातगाडी, रिक्षा यासारखी वाहने रस्त्यावर पार्क केलेली असतात.

बुधवारी रात्री दहाच्या सुमारास दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने हातामध्ये तलवारी लोखंडी रॉड आणि लाकडी काठी घेऊन धुडगूस घातला. समोर दिसेल ते वाहन या टोळक्याने फोडले. या घटनेत 40 ते 50 वाहनांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मार्केटयार्ड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चार आरोपींची धरपकड केली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये दहा ते पंधरा जण हातामध्ये नंग्या तलवारी घेऊन तोडफोड करत होते.

या स्थानिक गुंडांना पोलिसांचे भय नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.