Pune Crime News : 50 हून अधिक घरफोड्या करणारे सराईत चोरटे जेरबंद, तीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसीन्यूज : पुणे शहर आणि परिसरात 50 हून अधिक घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांसह एका अल्पवयीन चोरट्याला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, चांदीच्या विटा आणि पाच चारचाकी गाड्यांसह तब्बल 29 लाख 55 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सनीसिंग पापासिंग दुधानी (वय 19), सोहेल जावेद शेख (वय 19) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर एका अल्पवयीन चोरट्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुणे शहरात होणाऱ्या वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांची माहिती काढत असताना अटक केलेले सराईत गुन्हेगार हडपसर परिसरातील म्हाडा कॉलनी येथे थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशी त्यांनी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 50 हून अधिक घरफोड्या केल्याची कबुली दिली. यातील बारा घरफोड्या उघड झाल्या असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.