Pune Crime News : भाडयाने कार घेण्याच्या बहाण्याने 76 कारचा अपहार; तीन आराेपींना अटक, तिघे फरार

एमपीसीन्यूज : वाहने भाडेतत्वावर घेऊन एका टाेळीने तब्बल 76 कारचा अपहार केल्याची बाब येरवडा पाेलीसांच्या तपासात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून तिघे फरार आहेत. अटक आरोपींना दोन डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आशिष गंगाराम पुजारी (वय-32,रा.पालघर), सत्यप्रकाश मिठाईलाल वर्मा (30,र), अयान ऊर्फ राहूल ऊर्फ अँथोनी पाॅल छेतीयार (38) या तीन आराेपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत येरवडा पाेलीस ठाण्यात श्रीधर मुरलीधर जगताप (30,रा.भाेसरी,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.आय.शेख यांचे न्यायालयाने आराेपींना दाेन डिसेंबर पर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

याप्रकरणातील आराेपींचे साथीदार हैदलअली आलंदार हुसेन सय्यद (रा.लाेहगाव,पुणे), सादिकेत अकबर अहमदन (रा.ठाणे), मुन्ना चाचा (पूर्ण नाव,पत्ता नाही) हे तीनजण पसार झाले असून पाेलीस त्यांचा तपास करत असल्याचे येरवडयाचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक युनुस शेख यांनी सांगितले.

सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, आराेपी हैदरअली सय्यद याने साथीदारांसह येरवडयातील प्रतीकनगर येथे द सिटी ट्रॅव्हल्स नावाने ऑफीस सुरु केले.

आराेपींनी तक्रारदार जगताप यांची इनाेव्हा गाडी (एमएच 14 एचजी 9992) व गुन्हयातील इतर साक्षीदार यांचे स्वीफ्ट डिझायर, इर्टिगा, इन्हाेवा, एक्सेंट, मराेझा अशाप्रकारचे वेगवेगळया 75 वाहनांचे आपसात संगनमत करुन गाडी करार करुन वाहने भाडेतत्वावर घेतली. मात्र, करारात ठरल्याप्रमाणे भाडयाची रक्कम दिली नाही.

कराराप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांना गाडी भाडयाने न देता अवैध दारु वाहतुकीसाठी गाडया भाडयाने देऊन संबंधित गाडया मूळ मालकांना परत न करता त्यांचे अपहरण केले.

पाेलीसांनी सदर गुन्हयातील अटक आराेपी यांच्याकडे गुन्हयातील अपहार केलेल्या वाहनाबाबत माहिती विचारली असता आराेपी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे आराेपींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडील वाहने जप्त करावयाची आहे. सदर आराेपींच्या मदतीने फरार आराेपींचा शाेध घेऊन त्यांना गुन्हयात अटक करणे बाकी आहे.

अशाप्रकारे गुन्हे करणारी माेठी टाेळी अथवा रॅकेट सक्रिय असल्याचे दिसून येत असून त्याची सखाेल चाैकशी करणे आहे.

आराेपींविराेधात अशाचप्रकारे नेरुळ पाेलीस स्टेशन,नवी मुंबईत अशाप्रकारचे गुन्हे दाखल असून आणखी काेठे गुन्हे दाखल आहे याची माहिती जमा करणे आहे. त्यामुळे आराेपींना 14 दिवसांची पाेलीस काेठडी मिळावी अशी मागणी करण्यात आली.

याबाबत पुढील तपास येरवडा पाेलीस स्टेशनचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक समीर करपे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.