Pune Crime News : भरदिवसा 8 लाखाची लूटमार करणारे टोळके जेरबंद, 10 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावरील रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी घेऊन निघालेल्या कर्मचाऱ्याला भररस्त्यात अडवून शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याजवळील रोख 8 लाख 74 हजार रुपये लुटून नेणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 9 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यातील एकजण हा पेट्रोल पंपावरील कर्मचारी आहे.

उबेद अन्सार खान (वय 20, हडपसर), अरबाज नवाब पठाण (वय 19), तालीम आसमोहमद खान (वय 20), अजीम उर्फ अंट्या महंमद हुसेन शेख (वय 22), प्रजोत कानिफनाथ झांबरे (वय 20) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी बाळासाहेब आंबोरे हे सय्यदनगर परिसरातील एका पेट्रोल पंपावर मॅनेजर आहेत. 14 जून रोजी ते दोन दिवसांची रोकड घेऊन बँकेत भरणा करण्यासाठी जात होते. यावेळी त्यांना अडवून लुटण्यात आले होते. त्यांच्या जवळची 8 लाख 74 हजार रुपयांची रोकड लुटली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होती.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी 250 हुन अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आरोपींची ओळख पटवली आणि त्यानंतर या पाचही जणांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत मौजमजा करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी हा लुटीचा डाव रचला. यासाठी पेट्रोल पंपावरील कर्मचारी प्रजोत याला देखील या कटात सहभागी करून घेतले. त्याच्याकडून पेट्रोल पंपावरील, तेथे जमणाऱ्या पैशाची माहिती घेऊन हा गुन्हा केला.

या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी उबेद हा सराईत गुन्हेगार आहे. पुण्यासह एकूण चार गुन्ह्यात तो फरार असल्याचे समोर आले आहे. तर इतरही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक निरीक्षक संतोष तासगावकर, प्रसाद लोणारे, कर्मचारी महेश वाघमारे, अश्रूबा मोराळे, अजय गायकवाड, रमेश साबळे, प्रवीण काळभोर, दीपक लांडगे, दत्ता ठोंबरे, चेतन चव्हाण, विशाल भिलारे, विनोद शिवले, दाऊद सैय्यद, प्रमोद टोळेकर, अमरचंद्र उगले, विलास खदारे, संजय दळवी, स्वाती गावडे, स्नेहल गावडे यांच्या पथकांस केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.