Pune Crime News : सिंहगड रस्ता परिसरातून तस्कराकडून 8 लाखांचे मेफेड्रोन जप्त

एमपीसी न्यूज – सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रूक येथून मेफेड्रोन (एम.डी) अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तस्कराला सिंहगड पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून 8 लाख 9 हजारांचे 63 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. मोहमंद अब्दुल रहमान इरशाक (वय 23, रा. मुंढवा, मूळ-केरळ ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे आणि टीम हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दुचाकीवरून एक तरुण अमली पदार्थ विक्रीसाठी वडगाव बुद्रूक परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी किशोर शिंदे आणि धनाजी धोत्रे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोहमंदला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 8 लाख 9 हजारांचे 63 ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले.

पोलिसांनी मोहमंदविरूद्ध एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्याकडील अमली पदार्थ जप्त करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.