Pune bjp News : भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह दीडशे जणांवर गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : ओबीसी आरक्षणासाठी पुण्यातील कात्रज चौकात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह 150 जणांवर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आंदोलनात भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार गिरीश बापट यांच्यासह पुण्यातील विद्यमान आमदार, माजी आमदार नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भाजपच्या ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी योगेश पिंगळे, आयोजक दीपक माने, यशोधन आखाडे, अतुल चाकणकर, तुषार रायकर, ओमकार माळवदकर, शंतनु नरके, दिनेश नायकू, यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार संतोष भापकर यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी योगेश पिंगळे यांनी या आंदोलनासाठी भारती विद्यापीठ पोलीसात अर्ज केला होता. पोलिसांनी त्यांना covid-19 च्या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर आंदोलनाला परवानगी दिली होती. पण या आंदोलनात 50 पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी झाले होते. तसेच त्यांनी covid-19 च्या नियमांचा भंग करत रास्ता रोको केला होता. यामुळे कात्रज परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.