Pune Crime News : पुणे-सोलापूर महामार्गावर शस्त्राच्या धाकाने वाहन चालकांना लुटणारी टोळी सक्रीय

एकाच दिवशी दोन चालकांना लुटले; पोलिसांसमोर चोरट्यांचे नवे आव्हान

एमपीसी न्यूज – पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनचालकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणारी टोळी सध्या सक्रीय झाली आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या वाहन चालकांना कागदपत्रे विचारण्याच्या बहाण्याने वाहनांच्या काचा उघडण्यास भाग पाडून लुटमार केली जात आहे.

मंगळवारी (दि. 2) पहाटे साडेचारच्या सुमारास भिगवण जवळ मदनवाडी येथे एका टेम्पो चालकाला चार जणांनी मिळून लुटले. त्याच दिवशी पहाटे सहाच्या सुमारास दौंड तालुक्यातील भांडगाव येथे तीन जणांनी मिळून एका वाहन चालकाला लुटले. यामुळे महामार्गावरील वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महेश अनंतराव झगझाप (वय 32, रा. शेलगाव (व्होळे ), ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश हे टेम्पो चालक आहेत. सोमवारी ते त्यांच्या टेम्पोमध्ये पिकांवर मारण्याची औषध घेऊन बार्शी येथून पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे आले होते. दरम्यान, त्यांना घरगुती कामानिमित्त मदनवाडी येथील पाहुण्यांना भेटायचे असल्याने त्यांनी त्यांची पत्नी आणि दोन मुलांना देखील सोबत आणले.

पाहुण्यांना भेटून मंगळवारी पहाटे परत बार्शीकडे जाण्यासाठी ते निघाले. भिगवणजवळ मदनवाडी येथे आल्यानंतर त्यांना झोप लागल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला एका चहाच्या दुकानासमोर थांबवली आणि थोडा वेळ आराम केला.

पहाटे साडेचारच्या सुमरास चार अनोळखी चोरटे फिर्यादी महेश यांच्या टेम्पोजवळ आले. त्यातील एकाने महेश यांना टेम्पोतून खाली उतरवले. ‘मला तुझे लायसन्स दाखव. तू कुठला आहेस’ असे म्हणून चोरट्यांनी महेश यांच्या मागच्या खिशातून पैशांचे पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. दोन चोरट्यांनी महेश यांना चाकू दाखवून महेश आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले.

चोरट्यांनी 48 हजारांचे मिनी गंठण, 12 हजारांच्या सोन्याच्या कानातील दोन रिंगा, दोन हजारांचा एक मोबईल फोन आणि पाच हजारांची रोकड, असा एकूण 67 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

त्याच दिवशी दौंड तालुक्यातील भांडगाव येथे पहाटे सहा वाजता तीन चोरट्यांनी पिकअप चालक आणि त्याच्या सहप्रवासी तरुणाला चाकूचा धाक दाखवून एक लाख 11 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

चोरटे पोलिसांप्रमाणे मागतायत वाहनांची कागदपत्रे

महामार्गावर वाहन चालकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी पुन्हा एकदा सक्रीय झाली असून या टोळीने पुणे ग्रामीण पोलिसांसमोर नवीन आव्हान निर्माण केले आहे. हे चोरटे पोलिसांप्रमाणे अगोदर कागदपत्रांची विचारपूस करतात. त्यामुळे वाहन चालकांना विश्वास बसतो की कागदपत्रे विचारणारी व्यक्ती पोलीस आहे. त्यानंतर अचानक वाहन चालकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटले जाते. महामार्ग पोलीस, स्थानिक पोलिसांच्या गस्ती सुरु असताना देखील हे चोरते थेट महामार्गावर येऊन अशा पद्धतीचे धाडस करत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.