Pune Crime News : नर्सच्या वेशभूषेत आलेल्या महिलेने पळवले ससून रुग्णालयातून बाळ

एमपीसी न्यूज – पुण्यातील ससून रुग्णालयात नर्सच्या वेशभूषेत आलेल्या एका महिलेने तीन महिन्याचे बाळ पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस आणि नागरिकांनी सतर्कता दाखवत रिक्षाचा पाठलाग केला आणि या बाळाची सुखरूप सुटका केली. आणि बाळ पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका महिलेला अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, एक महिला दोन मुलींसह उपचारासाठी ससून रुग्णालयात आली होती. मोठ्या मुलीला सोनोग्राफी करण्यासाठी त्यांना जायचे होते. डॉक्टरांनी आतमध्ये बोलावल्यामुळे त्यांनी तीन महिन्याच्या छोट्या मुलीला ओळखीच्या महिलेजवळ ठेवले. याच दरम्यान नर्सच्या वेशभूषेत आलेल्या एका महिलेने बाळाला माझ्याजवळ द्या म्हणत तिच्याकडून बाळ घेतले. त्यानंतर बाळाचे अपहरण करून पळ काढला.

दरम्यान ही महिला सोनोग्राफी कक्षाच्या बाहेर आल्यानंतर तिला बाळ दिसले नाही. आसपास शोधाशोध केल्यानंतर तिने सुरक्षारक्षकांना विचारले. तेव्हा त्यांनी एक महिला बाळ घेऊन जाताना दिसल्याचे सांगितले. तातडीने बंडगार्डन पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सतर्कता दाखवत सीसीटीव्हीच्या मदतीने संबंधित रिक्षाचा शोध घेतला आणि रिक्षाचा पाठलाग करून बाळाची सुखरूप सुटका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.