Pune Crime News: रस्त्यात गाडी अडवून कोयत्याच्या धाकाने ‘गुगल पे’ द्वारे तरुणाला लुबाडले

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील स्ट्रीट क्राईममध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कुठे सोनसाखळी चोरीच्या तर कुठे रस्त्यावर अडवून लुटमारीच्या घटना घडताना दिसत आहे. धायरी परिसरात अशीच घटना उघडकीस आली. दुचाकीवरुन जाणाऱ्या एका तरुणाला तीन जणांच्या टोळक्याने अडवून त्याचा धाक दाखवून गुगल पेद्वारे त्याचा अकाउंटमधून पैसे काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी केतन पाटील (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी केतन पाटील रात्रीच्या सुमारास मित्राच्या घरी निघाले होते. डीएसके विश्व नांदेड फाटा या रस्त्याने प्रवास करत असताना तीन अज्ञात आरोपींनी रस्त्याच्या मध्यभागी उभी करून त्यांना अडवले.. त्यानंतर गाडीची चावी काढून घेत शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी गुगल पे द्वारे तीन हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले.

जिवाच्या भीतीने केतन यांनी ते सांगतील त्याप्रमाणे केले. त्यानंतर फिर्यादीला सोडून देण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक उमरे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.