Pune Crime News : आंबील ओढ्याजवळ खून करून पसार झालेल्या ‘त्या’ आरोपीला अटक

एमपीसीन्यूज  : ‘मोठा गुन्हेगार कोण, तू का मी’, या वादातून सोमवारी रात्री पुण्यातील आंबील ओढयाजवळ एका तडीपार गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. हा खून करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी अखेर अटक केली.

पुण्यातील मात्र पुलाखाली तो कुणाची तरी वाट पाहत बसला होता. अक्षय राम गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. तर सुरज भालचंद्र यशवद (वय 23) असे खून झालेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज यशवद हा विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत. त्याला शहराच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. तर अक्षय गायकवाड हा दरोडा व इतर अनेक गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार आहे. या दोघांची ओळख कारागृहात शिक्षा भोगत असताना झाली होती.

अक्षय हा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कारागृहातून रजेवर बाहेर आला आहे. तर सुरज हा तडीपारीचा भंग करुन शहरात दाखल झाला होता. दोघेही रविवारी रात्री अंबिल ओढा येथे भेटले होते. त्यांच्यात बोलता बोलता वादावादी झाली. दोघांपैकी ‘कोण मोठा गुन्हेगार’, असा वाद सुरु होता.

यावेळी सुरजने अक्षयला ‘तुझे जितके वय आहे, तितके गुन्हे माझ्यावर दाखल आहेत. तु जास्त शहाणपणाकरुन नकोस’, असे म्हणत शिवीगाळ केली.

यानंतर अक्षय तेथून रागाने घरी निघून  गेला. तो घरातून थेट चाकूच घेऊन बाहेर आला. त्याने रस्त्यातच सुरजला गाठले. तेथे चाकूने सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत सुरजला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.