Pune Crime News : सहकारनगर येथील मामा भाचे टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज – जीवघेणा हल्ला करुन लूटमार करणाऱ्या सहकार नगर येथील मामा भाचे टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे. या टोळीने पुणे-सातारा रस्त्यावरील एक देशी दारूचे दुकान आणि स्वारगेट परिसरातील एका वृत्तपत्र वितरणाचे काम करणाऱ्या नागरिकाला मारहाण करून लुबाडले होते. या टोळीतील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अजून चार आरोपींचा शोध सुरू आहे.

गौरव उर्फ लाल्या सुहास फडणीस (वय 30), अक्षय कैलास गरुड (वय 20), सचिन उर्फ घाऱ्या पांडुरंग सोंडकर (वय 31), महादेव सुरेश नंदुरे (वय 20) आणि चिराग संजय देशमुख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीतील आणखी चार जणांची नावे निष्पन्न झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तीन मार्च रोजी रात्रीच्या सुमारास आरोपींनी अरण्येश्वर कॉर्नर येथील देशी दारूचे दुकानात प्रवेश करू मॅनेजरला कोयत्याने मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवून रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तर दुसऱ्या एका घटनेत लक्ष्मीनारायण थिएटर समोर वर्तमानपत्राचे वितरण करणाऱ्या नागरिकाला मारहाण करून आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळ जमलेली रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून गेले होते. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दोन्ही प्रकरणाचा तपास सुरु असताना हे गुन्हे आरोपी गौरव फडणीस व अक्षय गरुड या दोघांनी केल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखी नऊ आरोपींसह असे गुन्हे केल्याची कबुली दिली.

आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीनंतर ऋषिकेश उर्फ हुक्या श्रीकांत गाडे हा या टोळीचा लीडर असल्याचे समोर आले. त्यांनी संघटित गुन्हेगारांची टोळी तयार केली असून त्याचे साथीदार पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरात सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याविरोधात आतापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा टाकणे, जबरी चोरी, घरफोडी, गंभीर दुखापती असे गंभीर स्वरूपाचे नऊ गुन्हे एकत्र केल्याची नोंद आहे. तर एकट्या ऋषिकेश उर्फ श्रीकांत गाडे याने स्वतंत्रपणे 57 गुन्हे केल्याची नोंद आढळली आहे.

या टोळीची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी समोर आल्यानंतर या टोळीविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी ठेवला होता. त्यांच्या या प्रस्तावाला अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर संजय शिंदे यांनी मंजुरी दिली असून या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.