Pune Crime News : आधीच नऊ गुन्हे दाखल, दहाव्याच्या तयारीत असताना सराईताला अटक, 2 पिस्तुल 4 काडतुसे जप्त

एमपीसीन्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने घोरपडे पेठेतून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

रोहित दिलीप माने (वय 28, रा. लोहियानगर) असे या सराईत गुन्हेगार याचे नाव आहे. रोहित हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नऊ गुन्हे दाखल आहेत. दहावा गुन्हा करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलीस कर्मचारी अमोल पवार व अजय थोरात हे पेट्रोलिंग करीत असताना सराईत गुन्हेगार रोहित माने हा घोरपडे पेठेत पिस्तूल घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली आणि त्याला पकडण्यासाठी सापळा रचला.

त्यानंतर घोरपडे पेठेतील एकबोटे कॉलनी समोर रस्त्यावर उभ्या असणाऱ्या रोहित माने याला त्यांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडती पोलिसांना दोन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे सापडली.

पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, विरोधकांपासून जीवाला धोका असल्यामुळे आपण हे पिस्तूल बाळगत असल्याचे त्याने सांगितले. रोहित माने हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूर्वीही नऊ गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.