Pune Crime News : पुण्यात जप्त केलेल्या ‘त्या’ अंमली पदार्थाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे

एमपीसी न्यूज – लोहमार्ग पोलिसांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सुरु केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये काही दिवसांपूर्वी 120 कोटी रुपयांचे 34 किलो चरस जप्त केले होते. या गुन्ह्याचा तपास आता दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे.

31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या पार्टीसाठी दिल्लीहून हे चरस पुणे, मुंबई, गोवा याठिकाणी पुरविले जाणार होते. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास आता लोहमार्ग पोलिसांसोबतच दहशतवाद विरोधी पथक काही करणार आहे.

हिमाचल प्रदेशातून दिल्लीमार्गे पुण्यात आणलेले हे अमली पदार्थ नववर्षाच्या पार्टीमध्ये मुंबई-गोवा नागपूर, पुणे-बंगलोर या शहरात विकले जाणार होते. परंतु त्यापूर्वीच लोहमार्ग पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरात दोघांना अटक करत हे चरस जप्त केले होते. लोहमार्ग पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात अनेक धागेदोरे मिळाले असून त्यात बॉलीवूडचे कनेक्शनही आढळून आल्याचे समजते.

लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायचे यांनी सांगितले की, एकापेक्षा अधिक जिल्ह्यात जर गुन्ह्याची व्याप्ती असेल तर त्याचा तपास सीआयडीकडे दिला जातो. त्याचप्रमाणे अमली पदार्थाच्या गुन्ह्याची व्याप्ती जर दोन पेक्षा अधिक जिल्ह्यात असेल तर त्याचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे सोपविण्यात येतो. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.