Pune Crime News : दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारीच्या टोळीला अटक

एमपीसीन्यूज : खराडी येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारी टोळीतील चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन कोयते, एक चाकु, पाच मोबाईल, मिरची पावडर, नायलॉन दोरी, असा 22 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

लखन सुभाष जाधव, जयेश परशुराम गायकवाड, करण हरिदास जाधव, अजय अनिल जाधव (सर्व रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. हे चौघही पुणे शहर, पिंपरी-चिचवड पोलिस आयुक्तालय, रेल्वे पोलिस ठाण्यातील गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आहे.

लखन जाधव विरूध्द जबरी चोरी, घरफोडी असे 21 पेक्षा जास्त गुन्हे, जयेश गायकवाड याच्यावर चोरी व जबरी चोरीचे तीन, करण जाधववर जबरी चोरी आणि लैंगिक अत्याचाराचा, तर अजय जाधव याच्यावर चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत.

आरोपी विरूध्द ‘पीएमपी’मधील चोऱ्या तसचे इतर स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असून ते सक्रीय गुन्हेगार आहेत.

रविवारी पोलिस अंमलदार सुरेंद्र साबळे यांना चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खराडीकडे जाणार्‍या बायपासकडे पीएमपी बसस्टॉप समोर चार ते पाच जण प्राणघातक हत्यारासह आले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी पथक तयार करून रविवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास चौघांना जेरबंद केले.

त्यांच्याकडून दोन कोयते, एक चाकु, पाच मोबाईल, मिरची पावडर, नायलॉन दोरी, असा 22 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्यांचा पळून गेलेला साथीदार सनी याच्यासह लकी देशी बार अ‍ॅण्ड बिअर शॉपी या दुकानावर दरोडा टाकून लुटणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

अटक आरोपींवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे, निरीक्षक रजनिश निर्मल यांच्या मार्गदशानाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदिप जमदाडे, पोलिस उपनिरीक्षक शशिकांत शिंदे, उपनिरीक्षक दीपक माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.