Pune Crime News : सहा वर्षापासून फरार असलेला छोटा राजन टोळीचा हस्तक जेरबंद

एमपीसी न्यूज – जागेची बनावट कागदपत्र तयार करून बांधकाम व्यावसायिककडे पंचवीस कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन उर्फ राजू निकाळजे टोळीतील सुरेश शिंदे, अशोक निकम, सुमित म्हात्रे आणि परमानंद ठक्कर या चार जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. त्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी मोक्का नुसार कारवाई सुद्धा केली आहे.

नवी मुंबई सत्र न्यायालयाने छोटा राजन, सुरेश शिंदे, अशोक निकम आणि सुमित म्हात्रे यांना दोन वर्षे कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. परंतु यातील आरोपी परमानंद ठक्कर हा गुन्हा घडला तेव्हापासून फरार होता आणि मागील सहा वर्षांपासून पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता.

दरम्यान गुढी शाखेच्या पोलिसांना परमानंद ठक्कर हा पुण्यातील कोंढवा परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने कोंढव्यातील थ्री ज्वेल्स कोलते-पाटील, टिळेकर नगर या उच्चभ्रू वस्तीत छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला सीबीआय स्पेशल क्राईम यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूर्वी खंडणी मागितल्याप्रकरणी आणि जागेचे बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. तसेच चेक बाउन्स झाल्याप्रकरणी 11 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पुणे शहर गुन्हे शाखेचे अपर सहायक आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, अंमलदार सचिन जाधव, योगेश जगताप, अजय थोरात, अय्याज दड्डीकर आणि तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.