Pune Crime News : लोहगाव परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज – कंपनीमध्ये कामाला जाऊ नये यासाठी झालेल्या वादानंतर एकाने तरुणाच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने वार करत प्राणघातक हल्ला केला. पुण्याच्या लोहगाव परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अशोक काळूराम ताठे (वय 50) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गणेश चौधरी (वय 32) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीतले आहेत. अशोक ताठे हा एका कंपनीत कामाला आहे तर त्या कंपनीत चौधरी हा कागदी पुठ्ठा गोळा करण्याचे काम करतात. शनिवारी सायंकाळी चौधरी हे खांदवे नगर या ठिकाणी उभे असताना आरोपी तेथे आला आणि त्याने मी ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीत पुठ्ठे गोळा करण्यासाठी जाऊ नको, असे चौधरीला सांगितले.

यावर गणेश चौधरी यांनी कंपनी काय तुझ्या बापाची आहे का असे म्हणाला. त्यानंतर रागावलेल्या ताठे यांनी खिशातून बटनाचा चाकू काढला आणि चौधरी याच्या गळ्यावर आणि आणि पोटावर वार केले. यामध्ये गणेश चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहाने करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.