Pune Crime News : पदपथावर झोपण्यास विरोध केल्याने एकावर प्राणघातक हल्ला

एमपीसीन्यूज : पदपथावर झोपण्यास विरोध केल्याने एका फिरस्त्याने पाठलाग करून एकावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचा धक्कादायक प्रकार ससून रुग्णालयाच्या गेटसमोर आज भर दुपारी घडला. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.

आज्या उर्फ अजय महादेव राऊत (वय 53) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर यात राजूसिंग ठाकूर (वय 48) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या हाताचे टाके काढण्यासाठी ससून रुग्णालयात आले होते. यावेळी ते गेटसमोरील रिक्षा स्टॅण्डजवळ आल्यानंतर अचानक पाठीमागे आलेल्या आज्या उर्फ अजय याने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करण्यास सुरुवात केली.

भरदुपारी हा प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला होता. आज्या हा त्याचा पाठलाग करत आला असावा, असा संशय आहे.

दरम्यान, फिर्यादी राजुसिंग यांनी त्याला काल रात्री येरवडा येथील इराणी मार्केटच्या पदपथावर झोपण्यास विरोध केला होता. त्या रागातून त्याने पाठलाग करून वार केल्याचे सांगण्यात आले आहे. माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्याला अटक केली.

अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.