Pune Crime News : पुण्यात सहायक पोलीस आयुक्तांच्या श्वानाची चोरी; दोघेजण ताब्यात

एमपीसी न्यूज – पोलीस दलातील एका साहेबाचा विदेशी जातीचा श्वान चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यासाठी पोलिसांनी दिवसरात्र कष्ट करून सीसीटीव्हीचे फुटेज तपासून विदेशी श्वान चोरट्यांना ताब्यात घेतले.

शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या बंगल्यातून बाहेर पडलेले विदेशी श्वान चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी दोन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.

लष्कर भागातील शासकीय निवासस्थानात विजय चौधरी कुटुंबियासह राहायला आहेत. त्यांनी पाळलेला विदेशी श्वान अचानक बंगल्यातून बाहेर गेला होता. त्यामुळे रस्त्यावर एकटेच फिरणाऱ्या  परदेशी श्वानाला पाहून दुचाकीस्वार दोघांनी त्याला पळवून नेले होते. घरातून श्वान बाहेर पडल्याचे पाहून चौधरी कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, त्याचा श्वानाचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर त्यांनी लष्कर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनमीत राऊत यांनी तपास सुरू केला.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण पडताळण्यात आले. पोलीस हवालदार चव्हाण यांना श्वान हडपसर भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हडपसर भागातून श्वानासह दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात श्वान देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.