Pune Crime News : सिगारेटच्या वादातून सराईत गुन्हेगाराकडून एकावर प्राणघातक हल्ला

एमपीसीन्यूज : सिगारेट आणू न दिल्यामुळे एका सराईत गुन्हेगाराने कामगारांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. याचाच जाब विचारण्यासाठी गेलेल्या मालकावर दोघा सराईत गुन्हेगारांनी कोयत्याने वार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला.

रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील दांडेकर पुलाजवळ ही घटना घडली.

दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी अनिल कदम, जितेंद्र कदम, मयूर कदम, आकाश उर्फ गिरी पोपट सोनवणे यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ओम सुरवसे यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी, ओम सुरवसे यांचा घोड्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे दोन कामगार काम करतात. या कामगारांनी आरोपीला सिगारेट आणून न दिल्याचा रागातून आरोपींनी या कामगारांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. कामगारांना मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी सुरवसे गेले असताना त्यांच्यात वादावादी झाली होती.

दरम्यान, रविवारी सकाळच्या सुमारास ओम हे शौचालयात जात असताना दोघा आरोपींनी त्यांना अडवले. ‘आज याला जिवंत सोडायचं नाही’, असे म्हणत आरोपींनी शिवीगाळ करत कोयत्याने वार केले. त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांना आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवला आणि ‘आमच्या नादाला लागाल तर सोडणार नाही’, अशी धमकी दिली.

दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.