Pune Crime News : चिकन उधार न दिल्याच्या रागातून विक्रेत्यावर खुनी हल्ला

पुण्याच्या भवानी पेठेतील घटना

एमपीसीन्यूज : रेस्टॉरंटमधून चिकन उधार न दिल्याच्या रागातून पुतण्याला शिवीगाळ करणा-याला समजावून सांगताना टोळक्याने तरूणाला दांडक्याने मारहाण करून जीवघेणा हल्ला केला. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री पावणेदहाच्या सुमारास भवानी पेठेतील चुडामन तालीम चौकात घडली.

बबन उर्फ अरबाज इकबाल शेख (वय २२, रा. भवानी पेठ), अतहर मुझफर सैय्यद (वय २३ रा. गुरूनानकनगर), सकलेन युनूस खुरेशी (वय २० रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जावेद शेख (वय ४०, रा. भवानी पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठेतील चुडामन तालीम चौकात जावेद यांचे लिमरा रेस्टॉरंट आहे. दोन दिवसांपुर्वी बबन उर्फ अरबाजने जावेद यांचा पुतण्या जुबेरला उधार चिकन दिले नाही. त्याचा राग आल्यामुळे बबन उर्फ अरबाजने जुबेरला शिवीगाळ केली.

त्यावेळी जावेद त्याला समजावून सांगत असताना बबन उर्फ अरबाजने त्यांना दांडक्याने मारहाण केली. आमच्याकडून पैसे मागता काय, आम्ही इथले भाई आहे, तुम्हाला नीट धंदा करायचा का नाही, असे म्हणत टोळक्याने परिसरात दहशत पसरविली. त्यामुळे दुकानदारांनी दुकाने बंद केली होती.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.