-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune Crime News: औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची पुण्यात फसवणूक; तिघांना अटक

गायत्रीदेवी म्हणतात, 'वकील अ‍ॅड. कमलेश पिसाळ यांनी फसवणूक केलीच नाही'

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – बनावट कागदपत्रे तयार करुन सातारा येथील औंध संस्थानाच्या श्रीमती गायत्रीदेवी भगवंतराव पंतप्रतिनिधी यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्यांचे वकील अ‍ॅड. कमलेश पिसाळ यांच्यासह चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. दरम्यान अ‍ॅड. पिसाळ यांच्याकडून आपली कोणतीही फसवणूक झाली नसल्याचे स्पष्टीकरण गायत्रीदेवी यांनी केल्यामुळे या प्रकरणी उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

शशी शंकर पोडवाल (वय 59, रा आळंदी रोड, येरवडा), आसिफ जलिल खान (वय 61, रा़ मार्केटयार्ड), अन्वर युनुस खान पठाण (वय 54, रा़ गोखलेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी गायत्रीदेवी यांचे स्वीय सहायक बलराज अरुण वाडेकर (वय 37, रा गुरुवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मालकीच्या सर्व्हे नं. 458/1 टिळक रोड, सदाशिव पेठ या मिळकतीचे शशी पोडवाल याने गायत्रीदेवी पंत प्रतिनिधी यांच्या मालमत्तेतील पोटभाडेकरु आसिफ व अन्वर यांच्याशी संगनमत करुन मालमत्तेचा बनावट नोटराईज समझोता करारनामा केला. त्यावर गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व त्यांच्या मुली चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी व हर्षिताराजे पंतप्रतिनिधी यांचे फोटो लावून खोट्या सह्या केल्या.

हा समझोता करारनामा खोटा आहे हे माहिती असतानाही श्रीमती गायत्रीदेवी पंत प्रतिनिधी यांचे वकिल अ‍ॅड. कमलेश पिसाळ यांनी त्या सर्वांशी संगनमत करुन बनावट दस्त ऐवज तयार करुन श्रीमती गायत्रीदेवी पंत प्रतिनिधी यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

अ‍ॅड. कमलेश पिसाळ यांनी आपली कोणतीही फसवणूक केली नाही – गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी

पुणे येथील जमीन व्यवहारप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अ‍ॅड. कमलेश पिसाळ हे आरोपी नसून वकील आहेत. ते गेली 15 वर्ष माझ्यासोबत काम करत आहेत. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असून त्यांनी असा कोणताही फसवणुकीचा प्रकार केलेला नाही, असे स्पष्टीकरण करणारा व्हिडिओ गायत्रीदेवी यांनी प्रसारित केला आहे. सातारा येथील प्रसिध्द विधीज्ञ अ‍ॅड. कमलेश पिसाळ यांच्यासह चार जणांवर पुण्यामधील एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याबाबतचे वृत्त प्रसिध्द झाल्यामुळे अ‍ॅड. कमलेश पिसाळ यांची नाहक बदनामी होत असल्याचा दावा करीत औंध संस्थानच्या सर्वेसर्वा तथा माजी जि.प.अध्यक्षा श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी याबाबत खुलासा केला असून अ‍ॅड. कमलेश पिसाळ यांच्याबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त पूर्णतः चुकीचे असून यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अ‍ॅड.. कमलेश पिसाळ असे चौथ्या आरोपीचे नाव असलेला पोलिसांचा दस्त. गुन्ह्याच्या हकिकतीमध्ये देखील अ‍ॅड.. कमलेश पिसाळ यांच्या नावाचा उल्लेख आहे.
 खोट्या सह्या आणि बनावट दस्ताऐवज तयार करुन आरोपींनी औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मालकीची जागा विकण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.
-बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, पुणे

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.