Pune Crime News : खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला

एमपीसी न्यूज : पुण्याच्या हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून खुनाचा प्रकार उघडकीस आला. एका व्यक्तीची तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह कॅनॉल मध्ये टाकून दिल्याचे समोर आले आहे. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल श्रीकृष्ण नेने (वय 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ सिद्धार्थ नेने (वय 39) यांनी तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी हडपसर परिसरातील शिंदेवाडी येथील कॅनॉल मध्ये एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाच्या अंगावर जखमा असल्याने पोलिसांनी शवविच्छेदनासाठी हा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला.

शवविच्छेदन अहवालामध्ये मृत व्यक्तीच्या चेहर्‍यावर आणि डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला असल्याचे समोर आले आहे.

हडपसर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.