Pune Crime News : अपहरण, खंडणीप्रकरणी गिरीश महाजन यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल

सहकारी संस्थेच्या संचालकाने अपहरण करून घेतली खंडणी

एमपीसीन्यूज : जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित या संस्थेच्या एका संचालकाचे अपहरण करून त्यांना डांबून मारहाण करुन 5 लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 28 जणांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संस्थेचे राजीनामे देण्यासाठी हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना जानेवारी 2018  ते जानेवारी 2021 कालावधीत घडली आहे. परंतु, त्यांनी तक्रार उशिरा दाखल केली आहे.

गिरीश महाजन, तानाजी भोईटे, निलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅड. विजय पाटील (वय 52) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅड. विजय हे वकिल असून जळगाव मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेचे संचालक आहेत. जानेवारी2018 पासून अ‍ॅड. पाटील आणि आरोपींमध्ये वादविवाद सुरू आहेत.

काही महिन्यांपुर्वी आरोपींनी संस्थेची कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने अ‍ॅड. पाटील यांना पुण्यात बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करून जबरदस्तीने मोटारीत बसवून सदाशिव पेठेतील एका फ्लॅटवर नेले.

त्याठिकाणी आरोपींनी त्यांचे हात-पाय बांधून डांबून ठेवले. त्यांना मारहाण करत पोटाला चाकू लावला. अ‍ॅड. पाटील यांच्यासोबत असलेल्यांना आरोपींनी डांबून ठेवले. त्यानंतर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत आरोपींनी त्यांच्याकडून 5 लाख रुपयांची खंडणी घेतली.

त्यानंतर आरोपींनी जळगाव येथे जाऊन त्यांच्या संस्थेत शिरून तोडफोड केली. त्यांच्या खिश्यातील पैसे आणि सोन्याचे दागिने लुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त चव्हाण करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.