Pune Crime News : पुलाखाली झोपलेल्या महिलेच्या कुशीतून चिमुरड्याचे अपहरण, पाच दिवसातील दुसरी घटना

_MPC_DIR_MPU_IV

एमपीसीन्यूज : हडपसर परिसरात गाडीतळ पुलाखालून एक वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण करण्यात आले. सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. एक वर्षाचे बाळ आईच्या कुशीत झोपले असताना दोन महिलांनी त्याला उचलून नेले. हडपसर परिसरातील पाच दिवसातील लहान बाळाचे अपहरण होण्याची ही दुसरी घटना आहे.

अपहरण झालेल्या बाळाची आई शर्मिला निलेश काळे (वय 22) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून दोन अज्ञात महिलांविरोधात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरणाचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीसोबत वाद झाल्यामुळे फिर्यादी महिला हडपसर येथील गाडी पुलाखाली काही ओळखीच्या महिलांसोबत राहत होती.

आज पहाटेच्या सुमारास त्या गाढ झोपेत असताना दोन महिला पायी चालत त्या ठिकाणी आल्या. आणि त्यांनी फिर्यादी यांच्याजवळ झोपलेल्या त्यांच्या एक वर्षाच्या मुलाला उचलून घेऊन गेल्या.

काही वेळा नंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादीनी संपूर्ण गाडीतळ परिसर पिंजून काढला. परंतु, बाळ सापडले नाही. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन गाठत बाळ हरवल्याची तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत या मुलाचा शोध सुरू केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.