Pune Crime News : गुंतवणुकीच्या अमिषाने नागरिकांची पावणे दोन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – फायनान्स कंपनीत गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 30 गुंतवणूकदारांची तब्बल 1 कोटी 79 लाख 59 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये तसेच फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ह्दयरंजन दासगुप्ता असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने कराड येथेही अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचा प्रकार तपासात समोर आला असून तो त्या गुन्ह्यात अटकेत आहे. त्याव्यतिरिक्त त्याच्यावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याबाबत पंकज वानखेडे (39, रा. मांजरी बुद्रुक,पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी वानखेडे हे कल्याणीनगर येथील प्रॉफिट मार्ट सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये डिलींग मॅनेजर म्हणून नोकरीस असताना त्या कंपनीत विभागीय अधिकारी म्हणून दासगुप्ता हा नोकरीस होता. त्याने स्वतःची फायनान्स कंपनी कोरेगावपार्क येथे असल्याचे सांगुन नागरिकांना प्रत्येक महिन्याला 8 टक्के व्याज मिळेल म्हणून लाखो रूपयांच्या रकमा गुंतविण्यास भाग पाडले. त्याने ही कंपनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुक करणार असल्याचे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन केला. नागरिकांनी पैसे गुंतविल्यानंतर त्याने त्यांना मुद्दल आणि व्याज न देता त्यांची 1 कोटी 79 लाख 59 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार 30 नागरिक पोलिसांकडे आल्यानंतर उघडकीस आला आहे. याप्रकरणी आणखी गुंतवणुकदार समोर येण्याची शक्यता असून संबंधीतांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.