Pune Crime News : पोलीस आयुक्तांकडून 53 वा मोक्का, मिसाळ टोळीतील आठ जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज –  गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कंबर कसली असून डोके वर काढू पाहणाऱ्या गुन्हेगारी डोळ्यांवर थेट मोक्काअंतर्गत कारवाई केली जात आहे.

विद्यापीठ पोलीस ठाण्यातील आणखी एका टोळीवर कारवाई करण्यात आली आहे.  आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ही 53 वी कारवाई आहे. यात 8 जणांचा समावेश असून, त्यात बाप लेकांचा समावेश आहे.

सार्थक संगित मिसाळ (वय 20, रा. न-हे गाव), अजय ऊर्फ शुभम रविंद्र हिरे (वय 23, रा. आंबेगाव खुर्द), तुकाराम रामचंद्र येनपुरे ऊर्फ वस्ताद (वय 52), तुषार प्रकाश डोंबे (वय 21), लकी ऊर्फ लखन अरूण गायकवाड (वय 19), तेजस ऊर्फ बंटी तुकाराम येनपुरे (वय 20), आदित्य ऊर्फ बबलू जगमोहन सिंन्हा (वय 19), कल्पेश अनिल चव्हाण (वय 32) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मागील एक वर्षापासून मिसाळ टोळीची दहशत सुरू होती. सार्थक मिसाळ हा या टोळी प्रमुख आहे. आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी या टोळीतील सदस्यांनी जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणे तसेच दहशत माजविण्यासारखे गुन्हे केलेले आहेत. सार्थक हा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या साथीदारांना घेऊन गुन्हे करत असे.

या जोडीने काही दिवसांपूर्वीच भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत 24 वर्षीय तरूणावर वार करत त्याच्या खूनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान येथील आरोपींना अटक करण्यात आली होती.

यातील सर्व आरोपींची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी पाहता पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार हा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे आला. त्यांनी प्रस्तावाची पाहणी केली. तसेच, टोळीवर मोक्का कारवाईचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.