Pune Crime News – सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याला कोयत्याच्या धाकाने लुबाडणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

एमपीसी न्यूज – हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर परिसरात संध्याकाळच्या वेळी इव्हिनिंग वॉकसाठी गेलेल्या सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.

सोरनसिंग करतारसिंग टाक (वय 20) असे ताब्यात घेतलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. एका अल्पवयीन आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सेवानिवृत्त कृषी अधिकारी 16 मार्च रोजी हडपसर येथील ग्रेडिंग सेंटर येथे इव्हिनिंग वॉकसाठी गेले होते. वॉक संपल्यानंतर ते एका झाडाखाली बसले असता अंधाराचा फायदा घेऊन चार अनोळखी इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील तीन तोळे व दोन तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या चेन जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेले होते. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास सुरु असताना हा गुन्हा सराईत आरोपी सोरनरसिंग टाक याने केली असल्याची माहिती पोलीस अंमलदार विनोद शिवले आणि विलास खंदारे यांना मिळाली होती. या गुन्ह्यात चोरलेली चेन विकण्यासाठी तो फुरसुंगी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने तीन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

याशिवाय त्यांनी केलेले चार वाहनचोरीचे कुणीही पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. त्याच्या ताब्यातून दोन चार चाकी वाहने दोन मोटारसायकली आणि सोन्या चांदीचे दागिने असा सहा लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.